काल दिनांक 9/4/ 2023 रोजी रात्री एक वाजून 30 मिनिटांनी संगमनेर तालुक्यातील श्री भारत रामभाऊ वलवे, राहणार धांदरफळ बुद्रुक , येथील करमाळ्यात गाईंच्या गोठ्यावर वीज वाहक तार तुटून पडल्याने शॉक लागून दोन गाईंचा मृत्यू झाला. भारत वलवे यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे गाई पासून मिळणारे दूध उत्पादन असल्याने या घटनेचा त्यांच्या प्रपंचावर थेट परिणाम झाल्याचे त्यांनी डेली न्यूज ला सांगितले.
उदरनिर्वाह त्यावर चालत असल्याने त्यांच्या गाईसुद्धा उत्तम प्रकारच्या व दर्जेदार होत्या त्यांचे आजचे बाजार मूल्य जवळपास दोन लाख 80 हजार इतके होते.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला, त्यात जुनाट वीजवाहक तारा हलक्याशा वाऱ्याने ही तुटून जनावरांच्या गोठ्यावर पडतात आणि दूध व्यवसाय त्यामुळे अडचणीत येतो. गाईंचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने धांदरफळ मध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे तथापि महावितरणने पंचनामा करून कागदी घोडे नाचवले आहेत नुकसान भरपाईची किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.